Tuesday, December 15, 2015

purush...

एक पुरुष हवा आहे.
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.
बटनं सापडत नाहीत म्हणून आरडाओरडा करत घर डोक्यावर घेणारा,
आमटीला फोडणी खमंग पडली म्हणून हुशारुन जाणारा,
केसातून बोटे फिरली की बाळ होऊन कुशीत घुसणारा,
दमदार पावलांनी तिन्हीसांजेचा केविलवाणा अंधार उधळून टाकणारा
पुरुष हवा आहे
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.

नाही..
हे मी म्हणत नाहीये,
या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून

-अनुराधा पोतदार





Monday, April 28, 2014

kairi bhaat


kairi bhaat by Kavita Mahajan (?) sahi naa...

भात पुलावाला असतो तसा मोकळा, शीत न् शीत वेगळा शिजवून घ्यायचा. कडक हिरवीगार कैरी किसून घ्यायची. किस जास्त जाड वा जास्त पातळ नको, मध्यम हवा. काजू तुपावर तळून घ्यायचे. शेंगदाणे भाजून त्यांची नाकं काढून टाकून ठेवायचे. ओलं नारळ खवून ठेवायचं. कोथिंबीर निवडून, चिरून ठेवायची. ही तयारी झाली की भात परातीत मोकळा करून पसरवून ठेवायचा. त्यावर नारळ, कैरी पसरवायची. मीठ घालायचं. ( हळद अज्जिबात घालायची नाही.) चवीपुरती साखर घालायची. काजू व शेंगदाणे घालायचे. मग वरून तूप-जिरे-कढीपत्ता यांची फोडणी घालायची. गार झालं की सगळं हाताने नीट मिसळायचे. मिसळायला चमचे वापरायचे नाही. मग भात बिनरंगीत काचेच्या बाउलमध्ये काढायचा. त्यावर कोथिंबीर पेरायची.
सुर्रेख आणि चवदा......र!
टीप : कैरीभातात हळद आवर्जून घालू नये. कैरीचा हिरवट छटेचा पांढरा, काजूचा पिवळट छटेचा पांढरा, शेंगदाण्याचा लालस पांढरा शुभ्र तांदळात मिसळला की किती सुरेख छटा दिसतात. हळद घालून ते दृष्टीसुख गमावू नये....




Wednesday, November 6, 2013


मी सगळी मरणार नाही
मरून गेल्यानंतरही
मरायचं बाकी असेल बरंच काहीबाही

माझा एक इवला नकळता स्पर्श
तुझ्या तळहा
​​
तावर तीळ बनून
उगवेल एक दिवस अचानक मधाळ

माझं एक अकारण खळाळतं हसू
तुझ्या शर्टाच्या कॉलरखालच्या
एक्स्ट्रॉ बटणासारखं
मी शिवून ठेवलेलं दिसेल, जे तू
काजात अडकवणारच नाहीस कधी

मनगटावर घड्याळाच्या पट्ट्याची
जाड फित उमटावी
त्वचेचा मूळ रंग दाखवत
तशी माझी आठवण

आणि बुटाच्या
वर आलेल्या खिळ्यासारखं
टोचणारं माझं बारीक भांडण

जिवंत राहील हे सारं तुझ्या मनात....

......................A Poem By Kavita Mahajan...

Sunday, October 13, 2013

अजूनही पत्रं लिहावी वाटतात

आणि मी लिहिते

मरून गेलेल्या माणसांना जिवंत पत्रं

वार्‍याचं ऐकावं

पाण्यासोबत खळखळून हसावं

निजावं अंधार पांघरून काळादाट

उन्हात लाही व्हावं शुभ्र शुभ्र

झाडाची फांदी तुटते

पानं गळतात

मोहोर धरतो

फुलांची फळं होतात

म्हणजेच झाड उत्तरं देत असतं आपल्या प्रश्नांची

जुन्या खडबडीत खोडाजवळ बसून

अदृश्य मुळांचं आश्वासन स्मरून

झाडाशी बोलावं

ढगांत शोधावेत आकार

पाखरांत रंग

रंगवाव्यात इच्छा

रंगवावीत स्वप्नं

तशीच लिहावीत पत्रं

जर अजूनही लिहावीशी वाटतात

माणसं मरून गेलेली असली तरी

जिवंत असतातच


ढग पाखरू झाड उन्ह अंधार पाणी वारा बनून....


-Kavita Mahajan



Thursday, October 10, 2013

Kavita mahajan Says,

काही रिच्युअल्स... कर्मकांडं... मला आवडतात. 
त्यामुळे कामाला एक छान लय, शिस्त येते. हळूहळू तंद्री लागत जाते.

काल मी एक कॅनव्हास घरी बनवला. रेडीमेड कॅनव्हास बाजारात मिळतात; पण कापड आणि टेक्श्चर व्हाइट आणून तो आपला आपण बनवण्याचा अनुभव निराळा असतो. कापड चौकटीला ताणून व्यवस्थित बसवणं हे नीट लक्ष देऊन करायचं काम. सैल राहिला की संपला कॅनव्हास. मग टेक्श्चर व्हाइटचा एक कोट व्यवस्थित लावायचा. तो कडकडीत सुकू द्यायचा. असे एकूण तीन कोट. तिसर्‍या कोटच्या वेळी हवं तर त्यात एखादा रंग मिसळता येऊ शकतो... पण हा मी शुभ्रच ठेवला.

अजूनही मागे जाता आलं असतं तर? म्हणजे कापड विणणं, त्याहीआधी शेतात कापूस पिकवणं! 
नांदेडला मी ज्या प्राथमिक शाळेत जायचे, त्या शाळेच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तेव्हा शेतं होती. आता काळीची पांढरी होऊन मोठाल्या वसाहती झाल्या आहेत. काळ्या लोण्यासारखी माती आणि त्यावर हिरवी रोपं आणि त्यातून दिमाखानं दागिन्यातल्या खचवलेल्या रत्नांसारखी शुभ्र कापसाची बोंडं. ती ठाम असत, वार्‍याने झुलतबिलत नसत. तो पांढरा रंग अजून मनावर ठसलेला आहे. शेतांना वाटेच्या बाजूने तारांची कुंपणं घातलेली होती. त्या तारा वाकवून शेतात शिरून मी एखादं बोंड चोरून घ्यायचे. दिवसभरात येताजाता त्या कापसाचा विलक्षण मऊपणा, त्याच्या पानांची, देठाची खरखर स्पर्श करून अनुभवणं आणि तो पांढरा रंग डोळे भरून पाहणं हा एक उद्योग असे. अशी चारपाच कापूसबोंडं दप्तरात किंवा पुस्तकांच्या खणात दोन-तीन महिने राहत. सुकून जात. मग हळूहळू त्यांचं आकर्षण विरे. त्यातला कापूस खेळताना फुटलेल्या गुडघ्यांचं रक्त पुसून आयोडिन लावायला वापरला जाई.

बाबांचे एक मित्र माहूरला होते. राजेकाका. उमदा आणि शौकीन माणूस. उर्दूच नव्हे तर अरबीही शिकले होते. इतरही काही भाषा त्यांना येत. पाठांतर खूप. शायरी ऐकवत. त्यांनी एकेकाळी घरी वाघ पाळले होते. त्यांच्या घरचा भात दुधात शिजवला जाई. असे किस्से ऐकलेले. त्यांचं 'शिकारनामा' हे उत्तम पुस्तक चांगले प्रकाशक न मिळाल्यानं दुर्लक्षित राहिलं; ते आता पुन्हा कुणीतरी काढलं पाहिजे. ते घरी सूत कातत. स्वतः कातलेल्या सुताचे कपडेच त्यांनी कायम वापरले. बाबांनी खरंतर त्यांच्याविषयी लिहायला हवं एकदा. पुढे पॅरॅलिसीस झाला आणि हा शिकारी माणूस अंथरुणाला खिळला... त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या घरातल्या त्या सुताच्या लडी आणि कपाटात विणून ठेवलेले तागे आज त्या कापसाच्या बोंडांपाठोपाठ अकारण आठवले.

माझ्या आजोबांनी काळी शाई कशी तयार करायची, याची कृती लिहून ठेवलेली आहे. दगड कुटून त्याचे रंग कसे तयार करायचे हेही त्यांनी एकदा मला सांगितलं होतं. कॅमल कंपनीचा काही महिने संप होता, तेव्हा आम्ही बरेच रंग असे बनवून वापरले; फार काही अडलं नाही.

एक चित्रकार मित्र कॅनव्हाससाठीच्या चौकटीही लाकूड तासून स्वतः बनवायचा. फ्रेमिंग तर आजही अनेकजण आपलं आपण करतात.

.... हे सगळं कशासाठी?

काहीतरी सुचतं, तेव्हा ते सुचल्याचा आनंद काळजात उसळ्या मारत असतो आणि निर्मितीची घाई होते. भराभरा काम करावं वाटतं. श्वास जड होतो. ही घाई नडते, हे अनुभवान्ती कळतं. 
कॅनव्हास बनवणं, रंगांच्या अचूक छटा तयार करून पाहणं... या सगळ्या प्रक्रियेत धाप कमी कमी होत जाते. श्वास लयीत येतो. वाढलेली धडधड ओसरते. कॅनव्हास तयार करताना चित्र हळूहळू अधिकाधिक स्पष्ट होत जातं मनात. आकार, रंग, रेषा आणि अर्थातच विचारही स्थिर होतात. स्थैर्यात केलेलं काम नेटकं होतं. आणि काम करताना व काम पूर्ण झाल्यावर मनाला एक शांतता व्यापून राहते. 

आपली सगळी तगमग या शांततेसाठीच तर असते.


Sunday, April 7, 2013


माधवास,

आज उगाचच कारण नसताना पत्र लिहावंसं वाटलं.
फोनवर बोलता येतं, पण मोकळं होता येत नाही.
पत्रातून भळभळता येतं. पुन:पुन्हा वाचता येतं पत्र.
काहीतरी वेगळं गवसतं, वाचता वाचता.
पत्र लिहिणाऱ्याचा चेहरा समोर यायला लागतो-
पूर्वी सिनेमात दाखवायचे तसा.
फोन वन-डायमेन्शनल आहे, पत्र थ्री-डायमेन्शनल वाटतं.
फोन उपचार वाटतो, पत्र दखल वाटते.
आई आणि दाई इतका फरक आहे दोघांत.
पत्र धन आहे, फोन संशोधन आहे.
फोन सोय आहे, पत्र सय आहे.
पत्राला नातं आहे. पत्राला गण आहे, गोत्र आहे.
पत्र नक्षत्र आहे, पत्र व्योम आहे.
क्षितिजावरचा इवलासा पक्षी आहे पत्र,
कागदावर कोरलेली वेरुळची नक्षी आहे पत्र.
नात्याला घातलेली साद आहे पत्र,
उगाचच घातलेला वाद आहे पत्र.
पत्र फुंकर आहे, पत्र झुळूक आहे.
आभाळाला भिडणारी वावटळ आहे पत्र,
कडेकपारीत झुळझुळणारा झरा आहे पत्र.
सीतेला पडलेला मोह आहे,
कालियाचा डोह आहे,
अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम आहे,
आठवणीच्या झाडावरून अवखळ वाऱ्यानं खुडलेलं पान आहे पत्र.
पत्र छंद आहे, नाद आहे, अंतरीचा निनाद आहे.
ज्ञानाची ओवी, तुक्याचा अभंग, दासाचा श्लोक,
येशूच्या खांद्यावरचा सूळ,
बैलाच्या घंटेची किणकिण,
खारकुंडीचा डोंबारखेळ,
पारंब्यांना लोंबकळणारा उनाड पोर,
संथ पाण्यात तरंग उठवणारा खडा,
आईचा मुका, बाबांचा धपाटा,
केळीच्या सालीवरून घसरणारी फजिती,
सक्काळी गावाजवळून जाणाऱ्या झुकझुक गाडीची घोगरी शीळ,
गुरवानं तळहातावर ठेवलेला बत्तासा,
मनगटावर नात्याला कसून बांधणारा राखीचा दोरा,
एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून शाळेकडे जाणारी पायवाट,
अलिबाबाची गुहा आहे रे पत्र,
बाबांच्या पाठंगुळीला बसलेलं अढळपद आहे पत्र,
बहीण सासरी निघाल्यावर रिते रिते झालेले डोळे आहेत पत्र,
अंगणात आईनं घातलेल्या रांगोळीचं, डोळ्यात पडलेलं प्रतिबिंब आहे पत्र,
अनंताला पडलेला प्रश्न आहे पत्र.
किनाऱ्याच्या ओढीनं काठावर आलेली लाट आहे पत्र,
श्रावणाच्या खांद्यावरची कावड आहे पत्र,
होय-नाहीचं द्वंद्व आहे पत्र,
स्वत:ला शोधण्याचा खेळ आहे पत्र,
टाचा उंचावून फळीवरचा खाऊ चोरण्याचा धिटुकला प्रयत्न आहे पत्र,
पाटीवर लिहिलेलं थुंकीनं पुसणं,
भवतालानं लादलेली घुसमट,
निर्लज्जपणाची कबुली,
नपुंसकत्वाची जाणीव,
गांधारीनं नाकारलेलं सूर्याचं अस्तित्व,
एकलव्याचं प्राक्तन,
विष्णूच्या बेंबीतून डवरलेल्या कमळात बसण्याची इच्छा,
गर्द वनराईला घुसळून टाकणारा वारा,
ठुसठुसणारं नखुरडं,
विवेकाला वटवाघळासारखं उलटं लटकलेलं नाकर्तेपण,
डोंगरावर उभं राहून आकाश झिमटण्याचा प्रयत्न,
रजस्वला द्रौपदीचा दीनवाणा चेहरा,
क्षितिजावर संध्या करणारा दिनकर
सुतळीचा फेटा बांधून सरसर फिरणारा भोवरा,
पोटात नक्षी मिरवणारा बैदुल,
तांबडय़ा मातीवरची बैलाच्या मुताची वेलांटी,
काय काय आहे रे पत्र!
अल्याड पल्याड कुठलीच सीमा नाही.
कुठं कुठं फिरून येता येतं.
पत्र माझा सखा आहे.
पत्र अज़ान आहे, चर्चमधली प्रार्थना आहे,
पत्र म्हणजे बुद्धाच्या डोळ्यांतली करुणा आहे.
पत्राच्या आजूबाजू आहेत
पत्राच्या चारी बाजूंनी फिरता यायला हवं.
एवढय़ाशा कागदात ब्रह्मांड दडलेलं असतं, नाही रे?
निवांत कृष्णाच्या अंगठय़ात रुतणारा बाण आहे पत्र.
आपल्या संस्कारांचं गोत्र आहे पत्र.
भल्याथोरल्या नात्याची आपल्या पायाखाली
आलेली पिटुकली सावली आहे पत्र-
जसजशी सायंकाळ होईल तशी ती मोठी होईल.
आपल्या नात्याला दृष्ट लागू नये म्हणून मी
हल्ली सावलीलासुद्धा तीट लावतो.
पत्राला कारण नाही.
तुझा- नाना
७- २- १३
ताजा कलम : काल मला एक प्रश्न विचारला-
अफझल गुरूला फाशी दिल्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
आनंद झाला का? एक बाइट हवाय.
मी म्हणालो, 'त्याने जे केले ते घृणास्पदच होते,
त्याची शिक्षा त्याला मिळाली आणि मिळायलाच हवी होती.
आनंद मात्र झाला नाही.'
आसपासचे आवाज क्षीण ऐकू येताहेत.
पूर्ण धूरकट नाही, पण स्पष्टसुद्धा दिसत नाही काही.
सुन्नपणा आलाय.
प्रश्न पडलाय-
माझ्या देशातल्या या मुलांच्या मनात- मग ते कुठल्याही
धर्म, पंथाचे असोत- असे देशद्रोही विचार का येताहेत?
राजकीयदृष्टय़ा आमचं काही चुकतंय का?
काही धोरणात्मक बदल आवश्यक आहेत का?
असतील तर आम्ही का थांबलो आहोत?
तरुणाईची मानसिकता अशी का होतेय, या प्रश्नाच्या
मुळाला आम्ही का भिडत नाही?
उद्या याच मार्गानं माझा मुलगा गेला तर?
त्याचाही अंत असाच झाल्यावर पुन्हा एक बाइट टीव्हीवर
'तुमच्या मुलाला फाशी झाली, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल?'
एका बापाला वाटतं तेच वाटणार.
पुन्हा तोच प्रश्न- आम्ही कुठे कमी पडतोय?
फाशी देऊन प्रश्न संपणार आहेत का?
वय झालेला बाप म्हणून प्रश्न छळताहेत रे.
चुकतंय का रे माझं?
लिहिताना हात थरथरत नसेल तर उत्तर धाड.
तुझीही तब्येत बरी नसते हल्ली.
तुझा- नाना
८- २- १३

Sunday, February 17, 2013

a lot can happen.....


 त्याने तिच्याकडे पाहिलं... तिलाही तो आवडला होताच... त्याच्या नकळत तिने टेबलाखालून मोबाईल वरून chat ओपन केलं, आणि बहिणीला पिंग केलं, "हेय श्रेया, he'j cool dude... atleast "one cofee must" types.... " मॉम ला कळव, रिश्ता पक्का..."

रात्र पापण्यांत उतरलेली... अभ्यास कमरेवर हात ठेऊन इको च्या खडूस madam सारखा समोर उभा... मागे उभा अभ्यास पुढे उभा अभ्यास... श्य्या..  तिने इथे तिथे पाहिलं, बाकीच्या दोघीही पेंगुळल्या होत्या...तेव्हढ्यात आईने मायेने कॉफी आणली... आईला एक फ्लाइंग कीस देत तिने विचारलं "तुला कसं कळलं मला कॉफी हवीये...? त्यावर आईचं कॉफीइतकं उबदार स्माईल... 

वाट पाहतोय... सीसीडी च्या गुबगुबीत सोफ्यावर पसरून... बाहेर अवेळी भरून आलेला पाउस... आयपॉड वर गुलजार... इश्कीया ची गाणी... समोरच्या कॅफे लाते सारखा रेखा भारद्वाजचा  नशीला आवाज... जिन दिनो आप थे, आंख मे धूप थी.... वाट पाहताना कॉफी वरचं क्रीम चं हार्ट वितळत चाललंय... 

कॉफी चं आणि मूड्स चं काहीतरी अजब नातं आहे बहुदा... आणि जसजसा काळ पुढे जातोय ते न सुटणा-या गाठीसारखं घट्ट होत चाललंय...म्हणजे, पूर्वी सुद्धा कॉफी होतीच की.. एरवी चहाचं आधण हे महत्वाचं इंधन असायचं, पण  मंगळागौर जागवल्यावर कॉफीच हवीहवीशी वाटायची, किशोरीताईंच्या मैफिलीच्या मध्यंतरात मिळणारी कॉफीसुद्धा त्यांच्या गाण्यासारखी आत खोलवर आत्म्यापर्यंत पोचायची... शिवाजी मंदिर किंवा गडकरीला उत्तम नाटक, प्रेमाने घेऊन दिलेला मोग-याचा गजरा आणि इंटर्वल मध्ये सुखवस्तूपण जपणारी  कॉफी म्हणजे "ह्यांना" पगार मिळण्याच्या दिवसाची इतिकर्तव्यता....तेव्हाच्या बायकांना आपण कमावत्या आहोत, याचा जो आनंद आणि वेगळेपणा वाटायचा, कॉफी नेमकी तशीच होती... खास, सहज हाताशी नसलेली आणि म्हणूनच तिचं अप्रूप....

पण आता चैनीच्या गोष्टी गरज कॅटेगरी मध्ये शिफ्ट व्हाव्यात तसं कधीमधी मिळणारी कॉफी आता मस्ट होऊन बसलीये...  यासाठी अर्थातच सीसीडी नामक संस्था कारणीभूत आहे. या sophisticated college  कट्ट्याने कॉफी या पेयाला आणि शब्दाला खूप वेगळा "फील" दिला...  गि-हाईक कधी जाणार याची वाट पाहणारे वेटर, कॉफी म्हटल्यावर मिळणारी ती एकमेव दुधाळ कॉफी, आणि मूड्स या शब्दाला जराही किंमत न देणारं त्या हॉटेल चं वातावरण यातून कॉफी ला अलगद बाहेर काढण्याचं काम या सीसीडी ने चोख केलं... आणि तरुणांची पावलं आपसूक या कॉफी कट्ट्याकडे वळायला लागली... tv वरच्या ads नी त्यात भर घातली  आणि पाहता पाहता कॉफी हे style stetment बनून गेलं. एकूणच कॉफी glamarous झाली  या कॉफीला मुलीनी आपलं आयकॉन मानणं स्वाभाविक आहे. आजच्या मुली कॉफीशी खूप जास्त attached आहेत, त्यांच्यातला स्मार्टनेस, कुल attitude आणि flexiblity हे गुण त्यांना कॉफी मध्ये आढळत असावेत...आजच्या जनरेशनला एकाच गोष्टीसाठी   (आणि व्यक्तीसाठी सुद्धा मे बी) खूप ऑप्शन हाताशी असण्याची सवय आहे, त्यामुळे खूप वेरिएशन्स असणारी कॉफी मुलीना जवळची वाटते... बोअर झाले म्हणून फ्लेवर चेंज करणा-या आम्हा आजच्या मुलीना म्हणूनच बहुतेक कॉफी बेस्ट वाटते... तसं तर चहा प्यायल्याने पण तरतरी येते, पण ती तरतरी ही मूड जागवणारी नाही mind जागवणारी असते, मनाला नाही, मेंदूला उब देणारी असते... उगीचच आपण चहापेक्षा कॉफी पितोय म्हणजे आपण जास्त स्मार्ट आहोत असं फील देणारा तिचा गंध आणि कपाच्या माध्यमातून तळव्यांना होणारी तिची उबदार जाणीव... आयक्यू ला satisfy करणा-या चहापेक्षा इक्यू चं कोड कौतुक पुरवणारी ही कॉफी म्हणूनच बेस्ट फ्रेंड सारखी वाटते. 

मैत्रिणीची मेंदी नुकतीच आटपलेली ...  आठवणीसुद्धा कोप-यातल्या टेडीबेअरसारख्या केविलवाण्या होऊन गेलेल्या... मैत्रिणीच्या किचनमध्ये जाऊन एकीने केलेली खुशबुदार झागदार कॉफी.... मेंदीला धक्का न लागू देता सगळ्या जणींनी तिला सिप सिप करून पाजलेली कॉफी... कॉफीचा मग हातात धरून काढलेले फोटोज... उद्याच्या फेसबुक ची बेगमी... प्रोफाईल पिक्चर तर परवा बदलेल पण डोळ्यातल्या पाण्याने खारट झालेली कॉफी मनाच्या मग मध्ये कितीतरी वर्षं वाफाळत राहील...