Sunday, February 17, 2013

a lot can happen.....


 त्याने तिच्याकडे पाहिलं... तिलाही तो आवडला होताच... त्याच्या नकळत तिने टेबलाखालून मोबाईल वरून chat ओपन केलं, आणि बहिणीला पिंग केलं, "हेय श्रेया, he'j cool dude... atleast "one cofee must" types.... " मॉम ला कळव, रिश्ता पक्का..."

रात्र पापण्यांत उतरलेली... अभ्यास कमरेवर हात ठेऊन इको च्या खडूस madam सारखा समोर उभा... मागे उभा अभ्यास पुढे उभा अभ्यास... श्य्या..  तिने इथे तिथे पाहिलं, बाकीच्या दोघीही पेंगुळल्या होत्या...तेव्हढ्यात आईने मायेने कॉफी आणली... आईला एक फ्लाइंग कीस देत तिने विचारलं "तुला कसं कळलं मला कॉफी हवीये...? त्यावर आईचं कॉफीइतकं उबदार स्माईल... 

वाट पाहतोय... सीसीडी च्या गुबगुबीत सोफ्यावर पसरून... बाहेर अवेळी भरून आलेला पाउस... आयपॉड वर गुलजार... इश्कीया ची गाणी... समोरच्या कॅफे लाते सारखा रेखा भारद्वाजचा  नशीला आवाज... जिन दिनो आप थे, आंख मे धूप थी.... वाट पाहताना कॉफी वरचं क्रीम चं हार्ट वितळत चाललंय... 

कॉफी चं आणि मूड्स चं काहीतरी अजब नातं आहे बहुदा... आणि जसजसा काळ पुढे जातोय ते न सुटणा-या गाठीसारखं घट्ट होत चाललंय...म्हणजे, पूर्वी सुद्धा कॉफी होतीच की.. एरवी चहाचं आधण हे महत्वाचं इंधन असायचं, पण  मंगळागौर जागवल्यावर कॉफीच हवीहवीशी वाटायची, किशोरीताईंच्या मैफिलीच्या मध्यंतरात मिळणारी कॉफीसुद्धा त्यांच्या गाण्यासारखी आत खोलवर आत्म्यापर्यंत पोचायची... शिवाजी मंदिर किंवा गडकरीला उत्तम नाटक, प्रेमाने घेऊन दिलेला मोग-याचा गजरा आणि इंटर्वल मध्ये सुखवस्तूपण जपणारी  कॉफी म्हणजे "ह्यांना" पगार मिळण्याच्या दिवसाची इतिकर्तव्यता....तेव्हाच्या बायकांना आपण कमावत्या आहोत, याचा जो आनंद आणि वेगळेपणा वाटायचा, कॉफी नेमकी तशीच होती... खास, सहज हाताशी नसलेली आणि म्हणूनच तिचं अप्रूप....

पण आता चैनीच्या गोष्टी गरज कॅटेगरी मध्ये शिफ्ट व्हाव्यात तसं कधीमधी मिळणारी कॉफी आता मस्ट होऊन बसलीये...  यासाठी अर्थातच सीसीडी नामक संस्था कारणीभूत आहे. या sophisticated college  कट्ट्याने कॉफी या पेयाला आणि शब्दाला खूप वेगळा "फील" दिला...  गि-हाईक कधी जाणार याची वाट पाहणारे वेटर, कॉफी म्हटल्यावर मिळणारी ती एकमेव दुधाळ कॉफी, आणि मूड्स या शब्दाला जराही किंमत न देणारं त्या हॉटेल चं वातावरण यातून कॉफी ला अलगद बाहेर काढण्याचं काम या सीसीडी ने चोख केलं... आणि तरुणांची पावलं आपसूक या कॉफी कट्ट्याकडे वळायला लागली... tv वरच्या ads नी त्यात भर घातली  आणि पाहता पाहता कॉफी हे style stetment बनून गेलं. एकूणच कॉफी glamarous झाली  या कॉफीला मुलीनी आपलं आयकॉन मानणं स्वाभाविक आहे. आजच्या मुली कॉफीशी खूप जास्त attached आहेत, त्यांच्यातला स्मार्टनेस, कुल attitude आणि flexiblity हे गुण त्यांना कॉफी मध्ये आढळत असावेत...आजच्या जनरेशनला एकाच गोष्टीसाठी   (आणि व्यक्तीसाठी सुद्धा मे बी) खूप ऑप्शन हाताशी असण्याची सवय आहे, त्यामुळे खूप वेरिएशन्स असणारी कॉफी मुलीना जवळची वाटते... बोअर झाले म्हणून फ्लेवर चेंज करणा-या आम्हा आजच्या मुलीना म्हणूनच बहुतेक कॉफी बेस्ट वाटते... तसं तर चहा प्यायल्याने पण तरतरी येते, पण ती तरतरी ही मूड जागवणारी नाही mind जागवणारी असते, मनाला नाही, मेंदूला उब देणारी असते... उगीचच आपण चहापेक्षा कॉफी पितोय म्हणजे आपण जास्त स्मार्ट आहोत असं फील देणारा तिचा गंध आणि कपाच्या माध्यमातून तळव्यांना होणारी तिची उबदार जाणीव... आयक्यू ला satisfy करणा-या चहापेक्षा इक्यू चं कोड कौतुक पुरवणारी ही कॉफी म्हणूनच बेस्ट फ्रेंड सारखी वाटते. 

मैत्रिणीची मेंदी नुकतीच आटपलेली ...  आठवणीसुद्धा कोप-यातल्या टेडीबेअरसारख्या केविलवाण्या होऊन गेलेल्या... मैत्रिणीच्या किचनमध्ये जाऊन एकीने केलेली खुशबुदार झागदार कॉफी.... मेंदीला धक्का न लागू देता सगळ्या जणींनी तिला सिप सिप करून पाजलेली कॉफी... कॉफीचा मग हातात धरून काढलेले फोटोज... उद्याच्या फेसबुक ची बेगमी... प्रोफाईल पिक्चर तर परवा बदलेल पण डोळ्यातल्या पाण्याने खारट झालेली कॉफी मनाच्या मग मध्ये कितीतरी वर्षं वाफाळत राहील...

शब्द शब्द जपून ठेव...



शब्द शब्द जपून ठेव...बकुळीच्या फुलापरी...

पाडगावकरांच्या काही खास ठेवणीतल्या गाण्यातलं हे एक गाणं.... या गाण्याला बकुळीचा गंध आहे... मला स्वतःला बकुळ या फुलाबद्धल अनाम विचित्र भावना आहेत- मला त्याचा गंध आवडतो असंही नाही आणि आवडत नाही असंही नाही... त्यात मोग-याचा मादक दरवळ नाही, जाई जुईचा हसरा गंध नाही, सायलीची शांत सुगंधी झुळूक नाही.. चाफ्याचा टवटवीतपणा नाही, इतकंच काय गुलाबाचा दिखावूपणा पण नाही... पण त्यात काहीतरी विलक्षण आहे- जी ए कुलकर्णींच्या कथांसारखं, आरती प्रभूंच्या कवितांसारखं.... काहीतरी अनवट....
जाउदे... शब्दांबद्धल बोलायचं तर बकुळीविषयीच बोलत बसले... शब्द शब्द जपून ठेव हे त्यांनी वेगळ्या अर्थाने म्हटलं असलं तरी आपण लिहिलेले शब्द जपून ठेवावेत असं मला कधीच वाटलं नाही- ते जपून ठेवले तर त्यांनाही बकुळफुलांसारखा वास येईल असं काहीतरी वेडपट असावं माझ्या डोक्यात... म्हणजे गाण्यांबद्धल बोलतेय मी हे सगळं... मला आधीच गाणी लिहून ठेवणं जमत नाही... कविता म्हणाल तर ती मी लिहायला बसले म्हणून येतच नाही- ती प्रचंड मानी आहे... उंबरठा मधल्या स्मिता पाटील सारखी... (हे नुसतं म्हणतानाही मला इतकं छान वाटतंय- स्मिता पाटील नावाचं रसायन... उफ्फ...) ती तिला हवी तेव्हाच कागदावर उतरते,,, एरवी मी मरत असेन तर तुळशीपत्र तोंडात ठेवायला सुद्धा फिरकत नाही ती...
पण गाण्यांचं असं नाही- गाण्यांचे शब्द हे मित्रासारखे... एक फोन टाकला किंवा एसेमेस की लगेच उठून भेटायला येणारे... माझ्यापर्यंत पोचायला जो काही वेळ लागेल तेवढाच- पण असं असूनही मी गाणी साठवून ठेवलेली नाहीत.... अनेकदा निर्माते संगीतकार मला विचारतात- “तुम्ही काही गाणी लिहून ठेवली असतील तर ती पाठवा आम्हाला म्हणजे आपण त्यातूनच काहीतरी निवडू-’’
मला हे जमत नाही... मी ते तसं त्यांना सांगूनही टाकते... पदार्थ काय किंवा गाणं काय... त्याच्या निर्मिती मागचं कारण जितकं इंटरेस्टिंग तितकं ते करताना मजा येते... टेन्शन येतं, कसं होईल आवडेल ना असे प्रश्न डोक्यात येतात आणि मनाला गुदगुल्या होतात... कोणी तरी येणारे म्हणून त्या माणसाच्या आवडीचं काहीतरी बनवणं, त्याला आवडतं हे लक्षात ठेवून चिमूटभर साखर जास्त पेरणं, वेलची दाताखाली आलेली आवडतं नाही हे ध्यानात ठेवून तिची पूड टाकणं... हे सगळं करण्यात जितकी मजा असते- आणि मग चपला काढताना त्या माणसाने म्हणावं- वा, दारापर्यंत आलाय हां वास...
ही सगळी मजा ते गाणं ताजं ताजं लिहिण्यात असते- सिच्युएशन काय आहे- कोणासाठी आहे- नायक कोण आहे- नायिका कशी आहे- तिला खळी पडते का, नायकाचे डोळे काळे आहेत का, त्यातलं कोणतं पात्र अबोल आहे- कोणाचं हसणं खळाळतं आहे.... कित्ती फरक पडतो एकेका तपशिलाने... प्रेमगीत जरी म्हटलं तरी ते कधी शूट होणारे यावर “चिंब भिजलेले” असेल की “ही गुलाबी हवा” असेल हे ठरतं ना... आणि ते सगळं जरी नंतर ठरलं तरी गाण्याला “ये” म्हणून बोलवायला कारण हवं की नको... ते कारण जितकं लोभस, गाणं तितकंच राजस... आणि सगळा फ्रेश मामला- आपल्याकडे स्टॉक नाही...
आज लक्षात आलं की लेख सुध्दा नाहीयेत लिहून ठेवलेले- पण काही फरक पडला नाही- नव्या उत्साहाने... नव्या उमेदीने घेतलेच की लिहायला.... आणि होतीलही भरभर लिहून... कारण... कारण तेवढं इंटरेस्टिंग होतं.....