Sunday, October 13, 2013

अजूनही पत्रं लिहावी वाटतात

आणि मी लिहिते

मरून गेलेल्या माणसांना जिवंत पत्रं

वार्‍याचं ऐकावं

पाण्यासोबत खळखळून हसावं

निजावं अंधार पांघरून काळादाट

उन्हात लाही व्हावं शुभ्र शुभ्र

झाडाची फांदी तुटते

पानं गळतात

मोहोर धरतो

फुलांची फळं होतात

म्हणजेच झाड उत्तरं देत असतं आपल्या प्रश्नांची

जुन्या खडबडीत खोडाजवळ बसून

अदृश्य मुळांचं आश्वासन स्मरून

झाडाशी बोलावं

ढगांत शोधावेत आकार

पाखरांत रंग

रंगवाव्यात इच्छा

रंगवावीत स्वप्नं

तशीच लिहावीत पत्रं

जर अजूनही लिहावीशी वाटतात

माणसं मरून गेलेली असली तरी

जिवंत असतातच


ढग पाखरू झाड उन्ह अंधार पाणी वारा बनून....


-Kavita Mahajan



No comments:

Post a Comment