Thursday, October 10, 2013

Kavita mahajan Says,

काही रिच्युअल्स... कर्मकांडं... मला आवडतात. 
त्यामुळे कामाला एक छान लय, शिस्त येते. हळूहळू तंद्री लागत जाते.

काल मी एक कॅनव्हास घरी बनवला. रेडीमेड कॅनव्हास बाजारात मिळतात; पण कापड आणि टेक्श्चर व्हाइट आणून तो आपला आपण बनवण्याचा अनुभव निराळा असतो. कापड चौकटीला ताणून व्यवस्थित बसवणं हे नीट लक्ष देऊन करायचं काम. सैल राहिला की संपला कॅनव्हास. मग टेक्श्चर व्हाइटचा एक कोट व्यवस्थित लावायचा. तो कडकडीत सुकू द्यायचा. असे एकूण तीन कोट. तिसर्‍या कोटच्या वेळी हवं तर त्यात एखादा रंग मिसळता येऊ शकतो... पण हा मी शुभ्रच ठेवला.

अजूनही मागे जाता आलं असतं तर? म्हणजे कापड विणणं, त्याहीआधी शेतात कापूस पिकवणं! 
नांदेडला मी ज्या प्राथमिक शाळेत जायचे, त्या शाळेच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तेव्हा शेतं होती. आता काळीची पांढरी होऊन मोठाल्या वसाहती झाल्या आहेत. काळ्या लोण्यासारखी माती आणि त्यावर हिरवी रोपं आणि त्यातून दिमाखानं दागिन्यातल्या खचवलेल्या रत्नांसारखी शुभ्र कापसाची बोंडं. ती ठाम असत, वार्‍याने झुलतबिलत नसत. तो पांढरा रंग अजून मनावर ठसलेला आहे. शेतांना वाटेच्या बाजूने तारांची कुंपणं घातलेली होती. त्या तारा वाकवून शेतात शिरून मी एखादं बोंड चोरून घ्यायचे. दिवसभरात येताजाता त्या कापसाचा विलक्षण मऊपणा, त्याच्या पानांची, देठाची खरखर स्पर्श करून अनुभवणं आणि तो पांढरा रंग डोळे भरून पाहणं हा एक उद्योग असे. अशी चारपाच कापूसबोंडं दप्तरात किंवा पुस्तकांच्या खणात दोन-तीन महिने राहत. सुकून जात. मग हळूहळू त्यांचं आकर्षण विरे. त्यातला कापूस खेळताना फुटलेल्या गुडघ्यांचं रक्त पुसून आयोडिन लावायला वापरला जाई.

बाबांचे एक मित्र माहूरला होते. राजेकाका. उमदा आणि शौकीन माणूस. उर्दूच नव्हे तर अरबीही शिकले होते. इतरही काही भाषा त्यांना येत. पाठांतर खूप. शायरी ऐकवत. त्यांनी एकेकाळी घरी वाघ पाळले होते. त्यांच्या घरचा भात दुधात शिजवला जाई. असे किस्से ऐकलेले. त्यांचं 'शिकारनामा' हे उत्तम पुस्तक चांगले प्रकाशक न मिळाल्यानं दुर्लक्षित राहिलं; ते आता पुन्हा कुणीतरी काढलं पाहिजे. ते घरी सूत कातत. स्वतः कातलेल्या सुताचे कपडेच त्यांनी कायम वापरले. बाबांनी खरंतर त्यांच्याविषयी लिहायला हवं एकदा. पुढे पॅरॅलिसीस झाला आणि हा शिकारी माणूस अंथरुणाला खिळला... त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या घरातल्या त्या सुताच्या लडी आणि कपाटात विणून ठेवलेले तागे आज त्या कापसाच्या बोंडांपाठोपाठ अकारण आठवले.

माझ्या आजोबांनी काळी शाई कशी तयार करायची, याची कृती लिहून ठेवलेली आहे. दगड कुटून त्याचे रंग कसे तयार करायचे हेही त्यांनी एकदा मला सांगितलं होतं. कॅमल कंपनीचा काही महिने संप होता, तेव्हा आम्ही बरेच रंग असे बनवून वापरले; फार काही अडलं नाही.

एक चित्रकार मित्र कॅनव्हाससाठीच्या चौकटीही लाकूड तासून स्वतः बनवायचा. फ्रेमिंग तर आजही अनेकजण आपलं आपण करतात.

.... हे सगळं कशासाठी?

काहीतरी सुचतं, तेव्हा ते सुचल्याचा आनंद काळजात उसळ्या मारत असतो आणि निर्मितीची घाई होते. भराभरा काम करावं वाटतं. श्वास जड होतो. ही घाई नडते, हे अनुभवान्ती कळतं. 
कॅनव्हास बनवणं, रंगांच्या अचूक छटा तयार करून पाहणं... या सगळ्या प्रक्रियेत धाप कमी कमी होत जाते. श्वास लयीत येतो. वाढलेली धडधड ओसरते. कॅनव्हास तयार करताना चित्र हळूहळू अधिकाधिक स्पष्ट होत जातं मनात. आकार, रंग, रेषा आणि अर्थातच विचारही स्थिर होतात. स्थैर्यात केलेलं काम नेटकं होतं. आणि काम करताना व काम पूर्ण झाल्यावर मनाला एक शांतता व्यापून राहते. 

आपली सगळी तगमग या शांततेसाठीच तर असते.


No comments:

Post a Comment